ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक अन्यायाविरुद्ध आम्ही पेटून उठलो आहोत. आमची आंदोलने केवळ संघर्ष नाहीत, तर ती न्यायाची नवी पहाट आहेत.
महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांनी वीजबिल भरण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून रोख स्वरूपात पैसे घेऊन फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. "आपली माती आपली माणसं" संस्थेने तत्काळ लक्ष घालून संबंधित व्यक्तीकडून नागरिकांचे पैसे वसूल केले व थेट महावितरण अधिकाऱ्यांकडे जमा केले. तसेच, अवाढव्य बिल येणाऱ्या स्मार्ट मीटरविरोधात ग्रामपंचायतींचा ठराव मिळवून देण्याची मोहीम यशस्वीपणे हाती घेतली आहे.
यश: नागरिकांची आर्थिक फसवणूक थांबली आणि भविष्यातील व्याजाचा भार टाळण्यात यश आले.
बँक ऑफ इंडिया पोलादपूर येथील अमराठी अधिकाऱ्यांना मराठीतच बोलण्याची तंबी संस्थापक श्री राज दादा पार्टे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली. तसेच, घरी आजारपणामुळे बँकेत येऊ न शकणाऱ्या पेन्शनधारकांची होत असलेली कुचंबणा लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी स्वतः गावोगावी जाऊन सर्वे करून त्यांना घरपोच पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली.
यश: अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावी जाऊन सर्वे सुरू केला आणि पेन्शन वितरणाचा मार्ग मोकळा झाला.
आंबेनळी घाटातून एसटी बस सेवा बंद असल्याने खाजगी टॅक्सी चालक प्रवाशांकडून अवाढव्य रक्कम आकारत होते. प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी संस्थेने महाड एसटी आगार प्रमुख यांची भेट घेऊन बस सेवा सुरू करण्याचे निवेदन दिले. रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी या निवेदनाची दखल घेऊन २३ ऑगस्ट २०२५ रोजी घाट सेवा पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
यश: घाटातील बस सेवा पुन्हा सुरू झाली आणि प्रवाशांची लूट थांबली.
आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण जनतेचे हाल होत होते. आरोग्य सुविधांचा अभाव आणि डॉक्टरांची कमतरता यावर तोडगा काढण्यासाठी ११ जुलै २०२५ रोजी "आपली माती आपली माणसं" सामाजिक संघटनेने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनाला जागे करून आरोग्य सेवेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी या माध्यमातून करण्यात आली.
यश: रिक्त पदे भरण्याचे आणि औषधांचा तुटवडा दूर करण्याचे प्रशासनाचे आश्वासन.
गौरी-गणपती सणापूर्वी पोलादपूर तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, झाडांच्या फांद्या आणि चिखलामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले. प्रवाशांना व शहरातून येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने रस्ते दुरुस्ती आणि साफसफाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
यश: सणापूर्वी रस्त्यांची स्वच्छता मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आली.
पोलादपूर तालुक्यातील केवणाळे व साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी संस्थेने कंबर कसली आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर हक्काच्या घरांपासून वंचित असलेल्या या नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी आणि कायमस्वरूपी घरांच्या बांधकामासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
स्थिती: पुनर्वसनासाठी जागा निश्चिती आणि निधी मंजुरीचा लढा अविरत सुरू.
थेट रणमैदानावरील काही खास क्षण
वर्षे संघर्ष
यशस्वी आंदोलने
शेतकरी सहभागी
न्यायासाठी कटिबद्ध